पिंपळगाव हरेश्वर | नरेंद्र देशमुख
ग्रामविकास मंडळ संचलित ग्रामविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व युवाशक्तीचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, आत्मविश्वास, चारित्र्यनिर्मिती व सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. हे पूजन विद्यालयाचे प्राचार्य पी. जे. तेली, उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख व पी. ए. जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी प्रा. मनोज सोनवणे यांनी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याचा सखोल व प्रभावी परिचय करून दिला. राजमाता जिजाऊ यांनी दिलेले संस्कार, स्वराज्याची प्रेरणा व शिवरायांच्या घडणीतील त्यांचे योगदान तसेच स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आत्मविश्वास, युवकांवरील विश्वास व “उठा, जागे व्हा” हा संदेश आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाचा आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमात विद्यार्थिनी वैष्णवी बडगुजर व आराध्या कासार यांनीही आपल्या मनोगतातून दोन्ही थोर व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचे सुंदर विवेचन केले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये प्रेरणा व उत्साह संचारला.
या कार्यक्रमास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडत विद्यार्थ्यांना संस्कार, राष्ट्रभक्ती व जीवनमूल्यांची दिशा देणारा ठरला.












