एमआयडीसीला चालना: नगरदेवळा येथील औद्योगिक वसाहतीच्या मुलभूत सुविधांसाठी नागपूर येथे उद्या बैठक; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची उपस्थिती
भडगाव (प्रा अमोल झेरवाल):
पाचोरा-भडगाव तालुक्यातील बेरोजगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून नगरदेवळा येथील सूतगिरणीजवळ मंजूर झालेल्या एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) मधील अंतर्गत आणि मुलभूत सुविधांच्या कामांसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दिनांक १० रोजी दुपारी सव्वा चार वाजता नागपूर येथे अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आमदार किशोर पाटील यांनी यासंदर्भात उद्योगमंत्र्यांना पत्र दिले होते, त्याची तातडीने दखल घेऊन ही बैठक लावण्यात आली आहे.
अडीचशे एकर एमआयडीसीला गती
आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नगरदेवळा येथे सुमारे अडीचशे एकर क्षेत्रावर एमआयडीसी मंजूर झाली आहे. यासाठी आवश्यक जागा आरक्षित करून उद्योगांना भूखंड देण्यासाठी प्लॉटींगचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, आता प्रत्यक्ष उद्योग उभारणीसाठी येथे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या अत्यावश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने आमदार किशोर पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
या बैठकीला एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीला गती मिळून उद्योग उभारणीचा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर हालचालींना वेग
विशेष म्हणजे, यापूर्वी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे प्रचारासाठी आले असताना, त्यांनी सभेमधूनच थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना कॉल करून नगरदेवळा येथील मंजूर एमआयडीसीत आवश्यक सुविधा आणि उद्योग उभारण्याबाबत सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीच्या कामांना आणखी चालना मिळाली आहे.
‘बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी धडपड’ – आमदार पाटील
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“पाचोरा-भडगाव तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळविण्यासाठी माझी धडपड सुरू आहे. त्या अनुषंगाने येथील मंजूर एमआयडीसीत उद्योगासाठी आवश्यक सोयीसुविधा करून उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न आहे. ही बैठक त्यादृष्टीने खूप महत्त्वाची आहे.”
– किशोर पाटील, आमदार (पाचोरा-भडगाव)
या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे पाचोरा-भडगाव परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.











