पिंपळगाव हरे येथील विद्यार्थ्यास आमदार किशोर पाटील व ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गीते यांच्या हस्ते बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल प्रदान
पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य अभियानांतर्गत पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास जळगाव जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पाचोरा तालुक्याचे तहसीलदार, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव हरे येथील इयत्ता बारावी कला शाखेचा दिव्यांग विद्यार्थी चेतन किसन राठोड याला बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल प्रदान करण्यात आली. लाभ घेणारा हा एकमेव लाभार्थी होता. आमदार किशोर पाटील व ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष रविंद्र सुकदेव गिते यांच्या हस्ते या सायकलीचे वितरण करण्यात आले. या सुविधेमुळे विद्यार्थ्याला शिक्षणासाठी ये-जा करणे अधिक सुलभ होणार असून त्याच्या शैक्षणिक प्रवासाला मोठी मदत मिळणार आहे.
याच कार्यक्रमात भूपेंद्र रवीसिंग गुर्जर यांना फोल्डेबल वॉकर तर दुर्गेश राजपाल राजपूत यांना एम.आर. किटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होण्यासाठी अशा योजनांचा मोठा लाभ होत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी नियमित शिक्षण घेऊन स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे, तसेच पालकांनी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गटशिक्षणाधिकारी विजय पवार, केंद्रप्रमुख सखाराम महाजन, केंद्रस्तरीय विशेष शिक्षक घनःश्याम चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील सर्व विशेष शिक्षक, विविध केंद्रांतील शिक्षक व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. साहित्य मिळाल्याबद्दल ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष, चिटणीस, सर्व संचालक तसेच ग्राम विकास ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.











