डॉ. शिवाजी शिंदे अध्यक्षपदी; डॉ. स्वप्नील पाटील व डॉ. प्रशांत सांगडे सचिवपदी विराजमान – विविध समाजोपयोगी उपक्रमांची घोषणा
पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी (दि. 19) स्वप्नशिल्प रेसिडेन्सी अँड बँक्वेट हॉल येथे अत्यंत दिमाखदार व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल डॉ. राजेश पाटील आणि उपप्रांतपाल हरविंदरसिंग ठेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी अध्यक्षपदाची, तर डॉ. स्वप्नील पाटील (प्रशासन सचिव) आणि डॉ. प्रशांत सांगडे (प्रकल्प सचिव) यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.
कार्यक्रमाची सुरुवात जॅक्सन डान्स अकादमीच्या बालकलावंतांनी सादर केलेल्या आकर्षक गणेशवंदनेने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
मावळते अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी अध्यक्षपदाची कॉलर, चार्टर व हॅमर सुपूर्द करून नूतन अध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे यांच्याकडे पदभार सोपविला. तसेच मावळते सचिव डॉ. अजयसिंग परदेशी यांनी सचिवपदाची पिन देऊन डॉ. स्वप्नील पाटील व डॉ. प्रशांत सांगडे यांना पदभार प्रदान केला.
यावेळी नूतन अध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे यांनी आगामी वर्षात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि जनकल्याणाशी निगडित अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करत सर्व सदस्यांच्या सहकार्याचे आवाहन केले. मावळते अध्यक्ष डॉ. मुकेश तेली आणि सचिव डॉ. अजयसिंग परदेशी यांनी गतवर्षात राबविण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचा आढावा सादर केला.
सोहळ्यात क्लबचे ज्येष्ठ सदस्य भरत सिनकर यांची उपप्रांतपालपदी, तर डॉ. मुकेश तेली यांची एन्क्लेव्ह सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अद्वैत दंडवते, प्रकाश तेली आणि डॉ. पंकज शिंदे यांना “रोटरी गौरव” पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
रोटरी फाउंडेशनला भरीव देणगी दिल्याबद्दल सुरेश मोर आणि डॉ. मुकेश तेली यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच रोटरी डिस्ट्रिक्टवर विविध पदांवर नियुक्ती झालेल्या प्रदीप पाटील, भरत सिनकर, निलेश कोटेचा, राजेश मोर, डॉ. अमोल जाधव, डॉ. पंकज शिंदे, सुयोग जैन आणि डॉ. पवनसिंग पाटील यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी रोटरी परिवारात नव्याने सहभागी झालेल्या सदस्यांना रोटरी पिन व सन्मानचिन्ह देऊन औपचारिक प्रवेश देण्यात आला. तसेच रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून शहर व तालुक्यातील विविध शाळांना प्रथमोपचार पेट्यांचे वितरण करण्यात आले.
उपप्रांतपाल हरविंदरसिंग ठेठी यांनी प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांचा परिचय करून दिला. त्यानंतर दोन्ही मान्यवरांनी रोटरीच्या सेवाभावी कार्याचा गौरव करत सामाजिक परिवर्तनासाठी रोटरी सदस्यांनी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, रोटरीचे आजी-माजी पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, सदस्य, प्राध्यापक, वकील, उद्योजक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाचोरा-भडगाव रोटरी क्लबच्या वतीने प्रांतपाल व उपप्रांतपाल यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजयसिंग परदेशी यांनी केले. प्रा. सी. एन. चौधरी यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर डॉ. स्वप्नील पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने दिमाखदार पदग्रहण सोहळ्याची सांगता झाली.












