८८९ मतदारांची पडताळणी; ८८१ Enumeration Forms चे वितरण व डिजिटायझेशन पूर्ण — उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्याकडून विशेष कौतुक
पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
दि. ०९ जुलै २०२६
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या Special Intensive Revision (SIR) अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात पाचोरा विधानसभा मतदारसंघाने जळगाव जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. होळ (ता. पाचोरा) येथील मतदान यादी भाग क्रमांक १२८ चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) साहेबराव शेवराम चौधरी यांनी त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले SIR चे काम १०० टक्के पूर्ण करून जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम काम पूर्ण करणारे BLO होण्याचा बहुमान मिळविला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांच्या नियंत्रणाखाली १८-पाचोरा विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन प्रत्येक मतदाराच्या माहितीची पडताळणी करत आहेत. यामध्ये मतदारांना Enumeration Form (EF) चे वितरण, भरलेले अर्ज संकलित करणे तसेच प्राप्त माहितीचे भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत मोबाईल ॲपवर डिजिटायझेशन करण्याचे महत्त्वपूर्ण काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पाचोरा विधानसभा मतदारसंघात एकूण ३४५ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कार्यरत असून, प्रत्येक अधिकारी आपल्याकडे सोपविण्यात आलेले काम नियोजित वेळेत, अचूक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
या अभियानात होळ (ता. पाचोरा) येथील मतदान यादी भाग क्रमांक १२८ चे BLO साहेबराव शेवराम चौधरी यांनी विशेष कर्तव्यनिष्ठा आणि कार्यतत्परतेचे दर्शन घडविले. त्यांच्या कार्यक्षेत्रात एकूण ८८९ मतदार असून, त्यापैकी **८८१ मतदारांना Enumeration Form वितरित करून संबंधित माहितीचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित ८ मतदारांची नोंद ‘Uncollectible’ म्हणून करण्यात आली आहे. अशा प्रकारे त्यांनी आपल्याकडे सोपविण्यात आलेले SIR चे संपूर्ण काम १०० टक्के पूर्ण केले.
विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यात SIR अंतर्गत आपल्याकडील मतदान यादी भागाचे १०० टक्के काम सर्वप्रथम पूर्ण करणारे BLO म्हणून महेशराव चौधरी यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पाचोरा विधानसभा मतदारसंघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भूषण अहिरे यांनी साहेबराव चौधरी यांचे विशेष अभिनंदन केले असून त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि कार्यतत्परतेचे कौतुक केले आहे.
महेशराव चौधरी यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन पाचोरा विधानसभा मतदारसंघातील इतर सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनीही विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम अचूक, गुणवत्तापूर्ण आणि विहित मुदतीत पूर्ण करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.
दरम्यान, मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेत नागरिकांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील संबंधित BLO यांना आवश्यक माहिती आणि कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देत सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.
पाचोरा विधानसभा मतदारसंघातील एका BLO ने जिल्ह्यात सर्वप्रथम १०० टक्के SIR काम पूर्ण केल्यामुळे प्रशासकीय स्तरावर पाचोऱ्याची विशेष दखल घेतली जात असून, महेशराव चौधरी यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.











