पिंपळगाव हरेश्वर (प्रा अमोल झेरवाल)
18/06/2026
ग्रामविकास मंडळ संचालित ग्राम विकास विद्यालयात महान राष्ट्रनायक, पराक्रमाचे प्रतीक आणि स्वाभिमानाचे अध्वर्यू महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रतिमापूजन विद्यालयाचे प्राचार्य पी. जे. तेली यांच्या शुभहस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाराणा प्रताप यांच्या कार्याला अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व पर्यवेक्षक पी. आर. देशमुख यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्याचा अभ्यासपूर्ण आणि सखोल परिचय करून दिला. त्यांनी महाराणा प्रताप यांचे कर्तृत्व, नेतृत्वगुण, दातृत्व, संघर्षमय जीवन, स्वातंत्र्यप्रेम, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठा यावर प्रकाश टाकला. संकटांशी झुंज देत स्वाभिमानाचे रक्षण करणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले. तर पर्यवेक्षक पी. ए. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास विद्यालयाचे उपप्राचार्य पी. ओ. चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य आणि स्वाभिमानाच्या मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा निर्माण झाली.
महाराणा प्रताप यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.












