पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
ग्राम विकास मंडळ, पिंपळगाव (हरे) ता. पाचोरा जि. जळगाव यांच्या वतीने संचालित ग्राम विकास विद्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन समारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे भूमिपूजन पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार मा. किशोर पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
या प्रसंगी पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या माजी आमदार मा. दिलीप ओंकार वाघ, पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या सह पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास परिसरातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, माजी संचालक, माजी मुख्याध्यापक, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच, देणगीदार, माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ अध्यक्ष पी बी पाटील, चिटणीस एस व्ही गिते, सर्व सदस्य, तसेच ग्राम विकास मंडळ संचालित विविध शाखांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचीही लक्षणीय उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा गौरव केला. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत विविध शाखांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या पदांवर यश मिळवून संस्थेचे नाव उज्ज्वल केले असल्याचे नमूद करण्यात आले. ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महत्त्वाचे केंद्र असून, येथील विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत, असेही मान्यवरांनी सांगितले.
नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. संस्थेची व शाळेची प्रगती अशीच अविरत सुरू राहावी, यासाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन सुयोग्यरीत्या पार पडले असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.












