पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांनी रांगोळी कलेत अभूतपूर्व यश संपादन करत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव कोरले आहे. रोटरी इंटरनॅशनलच्या 2025-26 या वर्षाच्या “Unite for Good” या जागतिक थीमवर आधारित भव्य रांगोळी साकारून क्लबने सामाजिक एकात्मतेचा प्रभावी संदेश दिला.
ही ऐतिहासिक रांगोळी ‘हॅपी स्ट्रीट’ कार्यक्रमादरम्यान तब्बल 3450 स्क्वेअर फूट क्षेत्रफळात उभारण्यात आली. सुमारे 1550 किलो रंगीत रांगोळी साहित्य वापरून 20 कलाकार व क्लब सदस्यांनी सलग 9 तासांच्या अथक परिश्रमातून ही कलाकृती साकारली. “युनाइट फॉर गुड” या संदेशाभोवती मानवतेची साखळी दर्शविणारी रचना विशेष आकर्षण ठरली.
या भव्य कामगिरीबद्दल क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश नैनाव (तेली) यांना अधिकृत सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला. या उपक्रमात सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, सर्व रोटरी सदस्य तसेच शैलेश कुलकर्णी यांच्या कलाछंद टीमचे मोलाचे योगदान लाभले.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे व संपूर्ण डिस्ट्रिक्ट टीमने क्लबच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले. सामाजिक संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे पाचोरा-भडगाव परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून क्लबवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रोटरी क्लब पाचोरा भडगावच्या या विक्रमामुळे केवळ स्थानिक नव्हे तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही रांगोळी कलेचा सन्मान उंचावला आहे. “युनाइट फॉर गुड” या संदेशातून एकता, सेवा आणि मानवतेचे बंध दृढ करण्याचा प्रभावी प्रयत्न या माध्यमातून साकार झाला आहे.











