पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथील रहिवासी अहिराणी कलाकार जगदीश तुकाराम तेली यांनी आपल्या गीतातून शेतकऱ्याच्या आयुष्यातील वेदनादायी वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. त्यांच्या ‘सोनाना हार’ या गीताने शेतकऱ्याच्या मनातील आर्त भावना आणि निसर्गाच्या कोपामुळे होणारी हतबलता जिवंत केली आहे.
Chandrakala Records या यूट्यूब चॅनेलवर दि. १० रोजी प्रदर्शित झालेल्या या गीताला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अहिराणी भाषेतील सादरीकरणामुळे ग्रामीण जीवनाचा गंध आणि वास्तव अधिक प्रभावीपणे समोर आले आहे.
या गीतात शेतकऱ्याचे जगणे, त्याचे स्वप्न आणि त्याची वेदना अत्यंत हळुवारपणे उलगडली आहे. शेतकरी निसर्गाच्या भरोशावर शेतात भांडवल गुंतवतो. तो आपल्या पिकाला लेकरासारखे जपतो, वाढवतो, त्यावर जीव ओवाळून टाकतो. मात्र अतिवृष्टी, चक्रीवादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे क्षणात त्याचे पीक जमीनदोस्त होते. त्या उद्ध्वस्त झालेल्या पिकासमोर उभा राहून शेतकरी किती असहाय होतो, त्याच्या डोळ्यातील अश्रू आणि मनातील वेदना या गीतातून प्रकर्षाने जाणवतात.
‘सोनाना हार’ या गीतात एक भावनिक प्रसंग उभा केला आहे. पत्नीचा साधा हट्ट पूर्ण करण्यासाठी शेतकरी राबराब राबतो आणि पीक आल्यावर तिला सोन्याचा हार करून देण्याचे वचन देतो. परंतु निसर्गाच्या अवकृपेने पीक नष्ट होते आणि शेतकरी हतबल होतो. त्या वेळी पत्नीचे शब्द अंत:करणाला भिडतात – “माले सोनाना हार नसणा तरी चाली, फक्त तुम्ही सुखी पाहिजे.” या संवादातून कुटुंबातील प्रेम, समजूतदारपणा आणि शेतकऱ्याच्या संघर्षाची वेदना अधोरेखित होते.
या गीताच्या माध्यमातून कलाकाराने शासनाचेही लक्ष वेधले आहे. नैसर्गिक आपत्ती, जंगली प्राण्यांचा उपद्रव आणि बदलते हवामान यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या व्यथेकडे गांभीर्याने लक्ष देऊन झालेल्या पिकांच्या नुकसानीची योग्य व तातडीने भरपाई द्यावी, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.
अहिराणी कलाकार जगदीश तेली यांनी आपल्या जिगरबाज सादरीकरणातून शेतकऱ्याच्या जीवनातील वास्तव अधोरेखित केले आहे. ग्रामीण भागातील कलाकार समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करत असल्याने त्यांच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘सोनाना हार’ हे गीत केवळ मनोरंजन नसून शेतकऱ्याच्या व्यथेचा जिवंत दस्तऐवज ठरत आहे.
गाण्याची लिंक खाली दिलेली आहे











