जळगाव | प्रा अमोल झेरवाल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई येथून जारी करण्यात आलेल्या अधिकृत संदेशानुसार दि. 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत राज्यात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व शासकीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्या खांबावर फडकविण्यात येणार असून, कोणतेही शासकीय समारंभ किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत. तसेच दिवंगत नेत्याला आदरांजली म्हणून शासनाच्या वतीने सर्व अधिकृत कार्यक्रम साधेपणाने पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, दि. 28 जानेवारी 2026 रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी कार्यालये, पोलीस विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच इतर शासकीय यंत्रणांना कळविण्यात आले आहेत. संबंधित सर्व विभागांनी शासनाच्या सूचनांनुसार तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
हा संदेश राज्य शासनाच्या प्रोटोकॉल विभागामार्फत सर्व प्रशासकीय यंत्रणांना पाठविण्यात आला असून, संपूर्ण राज्यात शोक वातावरण पसरले आहे.











