वार्ड क्र.७ मध्ये ‘विकासाचा विजय सोहळा’ — सकल बौद्ध समाजातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जाहीर नागरी सत्कार
पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
नुकत्याच पार पडलेल्या पाचोरा-भडगाव मतदारसंघातील नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) यांनी पाचोरा व भडगाव या दोन्ही नगरपालिकांमध्ये एकहाती सत्ता मिळवत दमदार यश संपादन केले. या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील वार्ड क्रमांक ७ येथे सकल बौद्ध समाज, पाचोरा यांच्या वतीने नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जाहीर नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती सुनिता किशोर पाटील (आ. किशोर पाटील यांच्या पत्नी) यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला वार्डातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विशेष म्हणजे, वार्ड क्रमांक ७ मध्ये खुल्या प्रवर्गाच्या जागेवर एस.सी. प्रवर्गातील उमेदवार देऊन निवडून आणण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. याबद्दल प्रवीण ब्राह्मणे व आमदार किशोर पाटील यांचे विशेष कौतुक करण्यात आले. प्रवीण ब्राह्मणे हे एस.सी. प्रवर्गातून निवडून आले असून, त्यांच्या पत्नींनीही खुल्या जागेवरून निवडणूक जिंकत पती-पत्नी अशी दोन्ही जागा जिंकण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली. या विजयामुळे पाचोरा शहरात शिंदे शिवसेनेला मोठे राजकीय बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
“आमदारांच्या सहकार्यामुळेच विजय” — प्रवीण ब्राह्मणे
आपल्या मनोगतात प्रवीण ब्राह्मणे यांनी आमदार किशोर पाटील यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याचे नमूद केले. “प्रभागातील अनेक विकासकामे आमदारांच्या माध्यमातून मिळाली. त्यांच्या पाठबळामुळेच आम्ही दोघेही निवडून येऊ शकलो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रभागातील घरे नावावर करण्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे अस त्यांनी सांगितलं.
प्रलंबित प्रश्न सोडवण्याची ग्वाही — आमदार किशोर पाटील
आपल्या भाषणात आमदार किशोर पाटील यांनी प्रभागातील विविध प्रलंबित मागण्यांवर प्रकाश टाकत सर्व अडचणी दूर करून विकासकामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. जागा अधिग्रहण करून शौचालय कसे बनवता येतील याबाबत माझे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत तसेच अतिवृष्टीच्या काळात प्रभागात पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. घरे नावावर करण्याच्या प्रश्नासाठी प्रवीण ब्राह्मणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे त्यांनी कौतुक केले. प्रवीण भाऊ साधा नाही मागे लागून लागून त्यांनी सगळ्यात पहिले आपल्या प्रभागातील घरांची फी भरून घेतली, आता संबंधित फाईल पुढील कार्यवाहीसाठी पुणे येथे प्रलंबित असल्याचेही आमदारांनी सांगितले.
तरुणांना शिक्षण व संघटनाचा संदेश
यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी तरुणांना उद्देशून मार्गदर्शन केले. तरुणांना लग्नासाठी मुली भेटत नाही कारण आजच्या तरुणांमध्ये शिक्षण व उद्योग करण्याची तसेच मेहनत घेण्याची इच्छा कमी झालिये. तरुण भरकटला आहे. यावेळी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा संदेश आचरणात आणला पाहिजे असे मत आमदारांनी व्यक्त केले. शिक्षणासाठी पैसा अडसर ठरत नाही. परिस्थितीवर मात करून स्वतःचे जीवन घडवा,” असे आवाहन त्यांनी केले. मी माझ्या सुरवातीच्या काळात 50 हजार Pf घेऊन पोलिस हवालदाराची नोकरी सोडून आलो. माझ्या कडे काहीच नव्हतं पण होता तो आत्मविश्वास, धाडस व मेहनत करण्याची दानत. आज या बळावर मोठा उद्योग उभा केला. करोडो रुपयांचा उद्योग मी आज करतो आहे. राजकारणात आलो आमदार झालो आता तिसऱ्या वेळा निवडून आलो आणि नगरपालिकेत देखील सत्ता घेतली. आत्मविश्वास धाडस व मेहनत करण्याची क्षमता असेल तर आपण काहीही करू शकतो असा सल्ला तरुणांना आमदार किशोर पाटील यांनी आपल्या भाषणातून दिला यांनी दिला.
खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्याने वार्ड क्रमांक ७ मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नव्या नेतृत्वाकडून विकासाच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.











