पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
पाचोरा शहर व तालुक्यातील सकल बौद्ध समाज बांधव तसेच समाजातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पाचोरा नगरपालिकेत नुकतेच निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षांसह शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार दि. २६ रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील जनता वसाहत परिसरातील धम्म ध्वजाजवळ उत्साहात पार पडणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आ. किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भरीव यश संपादन केले. या निवडणुकीत सुनीता किशोर पाटील या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या असून त्यांच्यासह तब्बल अठ्ठावीस नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. या विजयाबद्दल सामाजिक बांधिलकी जपत सकल बौद्ध समाजाच्या वतीने सर्व मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आ. किशोर पाटील हे राहणार असून कार्यक्रमास नवनिर्वाचित नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संस्था व मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. समाजातील ऐक्य, बंधुता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक या भावनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
तरी पाचोरा तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन सकल बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.











