पिंपळगाव (हरेश्वर) | नरेंद्र देशमुख
येथील ग्रामविकास मंडळ संचलित ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्रबोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य पी. जे. तेली, उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख व पी. ए. जाधव हे उपस्थित होते. तसेच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा प्रेरणादायी परिचय करून दिला. नेताजींच्या देशभक्तीचा गौरव करताना त्यांनी “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा” या घोषवाक्याचे महत्त्व सांगितले. तसेच आझाद हिंद सेनेच्या शौर्यगाथेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ केली.
त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांनी समाजकारण व राष्ट्रकारणाला दिलेले दिशा-दर्शन, त्यांची निर्भीड भूमिका, अस्मितेचा जागर आणि “२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण” हे तत्व विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले. त्यांच्या विचारांचा वारसा आणि समाजातील विविध घटकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदानही या वेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही मोठ्या उत्साहाने उपस्थित होते व यावेळी सर्वांनी देशप्रेम, शिस्त व राष्ट्रभक्तीचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प व्यक्त केला. अशा प्रकारे प्रेरणादायी वातावरणात ही जयंती साजरी करण्यात आली.











