पिंपळगाव हरेश्वर (प्रा अमोल झेरवाल):
ग्रामविकास मंडळ संचालित ग्रामविकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथील जेष्ठ शिक्षक अर्जुन मुरलीधर सावळे यांनी शिक्षक अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील अंतिम टप्प्यातील राज्यस्तरीय स्वरवादन स्पर्धेत सातवा क्रमांक पटकावत विद्यालयाचा व परिसराचा गौरव वाढवला आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अर्जुन सावळे यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यात पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले. या उल्लेखनीय यशामध्ये त्यांना तबलावादक म्हणून सुवर्णपदक विजेते सागर थोरात यांची अनमोल साथ लाभली. या यशस्वी जोडीने राज्यस्तरावर आपला ठसा उमटवीत मोठा बहुमान मिळवला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय यशामागे पाचोरा गटशिक्षणाधिकारी विजय पवार तसेच पिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सखाराम महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष पी. बी. पाटील, चिटणीस एस. व्ही. गीते, सर्व संचालक मंडळ, ग्रामविकास विद्यालयाचे प्राचार्य पी. जे. तेली, उपप्राचार्य पी. ओ. चौधरी, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख व पी. ए. जाधव, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अर्जुन सावळे व सागर थोरात यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.












