पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
अखिल भारतीय ग्राहक पंचायत व रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पुनगाव रोड, पाचोरा येथे दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी माँ साहेब जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती व युवक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी माँ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उत्कृष्ट भाषणे करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत सचिव व जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख यांनी मार्गदर्शन करताना माँ साहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रावर सविस्तर प्रकाश टाकला. “जयंती साजरी करणे म्हणजे केवळ औपचारिकता नव्हे, तर हा दिवस प्रेरणा घेण्याचा, संकल्प करण्याचा आणि राष्ट्राप्रती समर्पणाचा आहे,” असे सांगत त्यांनी स्वामी विवेकानंदांचा भयमुक्त, स्वावलंबी व कर्तव्यनिष्ठ जीवनाचा आदर्श आत्मसात करण्याचे आवाहन केले.
रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी युवक दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधत थेलेसेमिया आजाराविषयी जनजागृती केली व समाजातील प्रत्येक घटकाने आरोग्याबाबत सजग राहावे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमासाठी मंचावर ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष संजय पाटील, आयटी सेल जिल्हाध्यक्ष शरद गीते, रोटरी क्लब सदस्य डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. सिद्धांत तेली, शाळेचे मुख्याध्यापक जि. व्ही. सोमवंशी, पर्यवेक्षक व्ही. पी. देशमुख यांच्यासह शिक्षक–शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमास सुमारे बाराशे विद्यार्थी–विद्यार्थिनी उपस्थित होते.
सूत्रसंचालन हेमांगी काटकर मॅडम यांनी केले तर नेरकर सर यांनी आभार प्रदर्शन केले. विशेष आकर्षण ठरले ते पाचवीत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थी हर्षवर्धन पाटील यांचे प्रेरणादायी भाषण. स्पर्धेत हर्षवर्धन पाटील व वर्षा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच कुस्ती खेळात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल यश भोसले या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास व सामाजिक भान जागवणारा ठरला, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.











