पिंपळगाव हरेश्वर (नरेंद्र देशमुख) शहर प्रतिनिधी
शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने आयोजित 53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा, संशोधनवृत्तीचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रभावी ठसा उमटवत घवघवित यश संपादन केले आहे.
दि. 7 व 8 जानेवारी 2026 रोजी सेंट टेरेसा हायस्कूल, शिरसोली रोड, जळगाव येथे पार पडलेल्या या विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून ग्राम विकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा अधोरेखित केली.
माध्यमिक गटातून चि. अनुज अजय बडगुजर (इयत्ता 11 वी) या विद्यार्थ्याने सादर केलेल्या विज्ञान उपकरणास जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून, या नाविन्यपूर्ण उपकरणाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. या यशामागे माध्यमिक विभागाचे विज्ञान शिक्षक तसेच पाचोरा तालुका विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष उल्हास श्रीराम पाटील व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विज्ञान शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामविकास मंडळ संचलित कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रामविकास विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी, तसेच प्रा. मनोज सोनवणे, प्रा. अपूर्व गीते, प्रा. वामन जाधव, प्रा प्रमोद क्षीरसागर, प्रा. राम पाटील, प्रा. भास्कर पवार, प्रा. संदेश पाटील, प्रा. विनोद महाजन, प्रा. राहुल पाटील, प्रा. अमोल झेरवाल, प्रा. संगीता पवार, प्रा. ज्योती महाजन, प्रा. जया महाजन, प्रा. रुपाली क्षीरसागर आदी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे ग्राम विकास विद्यालयाची शैक्षणिक परंपरा अधिक भक्कम झाली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वैज्ञानिक गुणवत्ता पुन्हा एकदा जिल्हा व राज्यस्तरावर अधोरेखित झाली आहे.











