जळगाव शहर | प्रा अमोल झेरवाल
शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने आयोजित 53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ग्राम विकास उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील विद्यार्थ्यांनी आपल्या वैज्ञानिक बुद्धिमत्तेचा ठसा उमटवत माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले असून विद्यालयाचे मॉडेल राज्यस्तरावर निवडले गेले आहे.
दि. 07 व 08 जानेवारी 2026 रोजी सेंट टेरेसा हायस्कूल, शिरसोली रोड, जळगाव येथे आयोजित या विज्ञान प्रदर्शनात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपली नाविन्यपूर्ण वैज्ञानिक उपकरणे सादर केली. या स्पर्धेत माध्यमिक गटातून चि. अनुज अजय बडगुजर (इयत्ता 11 वी विज्ञान) या विद्यार्थ्याने सादर केलेल्या उपकरणाने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्याच्या प्रकल्पाला जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले असून या उपकरणाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
या यशामागे विज्ञान शिक्षक तसेच पाचोरा तालुका विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष उल्हास श्रीराम पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या शास्त्रशुद्ध मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, जिज्ञासा व सर्जनशीलतेला चालना मिळाली.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण उपस्थित होत्या. यावेळी उपशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, श्रीमती रागिणी चव्हाण, एजाज शेख, पाचोरा विभागाचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार, जळगाव जिल्हा अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे, उपाध्यक्ष संदीप पाटील, सचिव सुनील वानखेडे, रवींद्र चौधरी, मुख्याध्यापिका सिस्टर जुलीट, श्रीमती वनिता अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनासाठी डॉ. पी. एस. कोळी, प्रा. कांचन पाटील, प्रा. आर. बी. देशमुख, एस. एस. अहिरे व अविनाश मोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या उल्लेखनीय यशाबद्दल ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष पी. बी. पाटील, चिटणीस एस. व्ही. गीते, संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जे. तेली, उपमुख्याध्यापक पी. ओ. चौधरी, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख व पी. ए. जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे ग्रामविकास विद्यालयाची वैज्ञानिक गुणवत्ता, संशोधनवृत्ती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची परंपरा अधिक बळकट झाली असून, भविष्यातही अशाच उज्ज्वल आणि देशाभिमान वाढविणाऱ्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.











