
नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), नंदुरबार यांच्या वतीने शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेली विभागस्तरीय संगीत वाद्य वादन स्पर्धा २०२५–२६ ही स्पर्धा दि. २० डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहात पार पडली. या स्पर्धेचा निकाल नुकताच अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. दीपक साबळे (प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार) अध्यक्षस्थानी होते. यावेळी नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, स्पर्धा समन्वयक, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन व व्यवस्थापन DIET नंदुरबारच्या शिक्षक व कर्मचारी वृंदाने केले.
या स्पर्धेत हार्मोनियम व बासरी अशा स्वर वाद्यांचे सादरीकरण करण्यात आले. परीक्षकांनी ठरवून दिलेल्या तांत्रिक व कलात्मक निकषांनुसार स्पर्धकांचे मूल्यमापन करण्यात आले.
स्वर वाद्य (हार्मोनियम/बासरी) प्रकारातील निकाल
या प्रकारात यूआरसी येथील राम नारायण पेठेकर (हार्मोनियम) यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.
पाचोरा येथील अर्जुन रघुनाथ सावळे (बासरी) यांनी द्वितीय क्रमांक, तर
सिन्नर येथील अनुराधा संदीपान ढोरमारे (हार्मोनियम) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
चोपडा येथील स्वप्नील प्रतीप सोनवणे व नवापूर येथील अविनाश विठ्ठल कोकणी यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला.
ताल/वादन प्रकारातील निकाल
या प्रकारात पाचोरा येथील सागर देविदास थोरात यांनी प्रथम क्रमांक मिळवून विभागात आपली कला सिद्ध केली.
निफाड येथील प्रसाद सुभाष केळके यांनी द्वितीय, तर
यावल येथील नारायण विठ्ठल कुंभार यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
तळोदा येथील सचिन नारायण पाटील आणि मालेगाव येथील विश्वनाथ राजाराम बच्चाव यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला.
समारोपप्रसंगी बोलताना डॉ. दीपक साबळे यांनी सांगितले की, “अशा स्पर्धांमुळे शिक्षकांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो तसेच तणावमुक्त व सृजनशील वातावरण निर्मितीस हातभार लागतो.” विजेत्या व सहभागी सर्व स्पर्धकांचे त्यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील कार्यवाही व नियोजनासाठी प्रादेशिक शिक्षण प्राधिकरण, नाशिक तसेच संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना पाठविण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
अभिनंदनाचा वर्षाव
झालेल्या स्पर्धेत ग्राम विकास संचिलत ग्राम विकास विद्यालयाचे शिक्षक अर्जुन सावळे यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष व चिटणीस, सर्व संचालक मंडळ, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक बंधू-भगिनीं आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.












