शिक्षक व अधिकारी स्पर्धांचा पाचोऱ्यात उत्साह!
ग्रामविकास मंडळाच्या शिक्षकांनी मिळवले घवघवीत यश
पाचोरा: (प्रा अमोल झेरवाल)
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिक्षक व अधिकारी स्पर्धा २०२५’ चे पाचोरा पंचायत समिती अंतर्गत यशस्वीरित्या आयोजन करण्यात येत आहे. केंद्राप्रमाणे विविध विषयांच्या स्पर्धांचे नियोजन सुरू असून, तालुक्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.
🎯 स्पर्धेचे स्वरूप
या स्पर्धांमध्ये विविध विषयांवरील कौशल्ये आणि ज्ञान तपासले जात आहे. गटशिक्षणाधिकारी विजय पवार, शासकीय प्राथमिक शिक्षण अधीक्षक सरोज गायकवाड, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, पिंपळगाव हरेश्वर गटसंसाधन केंद्र प्रमुख सखाराम महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व स्पर्धा सुरळीत पार पडत आहेत. विविध विषयाचे शिक्षक यात स्पर्धक म्हणून आपला ठसा उमटवत आहेत, ज्यामुळे तालुक्यातील शैक्षणिक वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
🏆 पिंपळगाव हरेश्वरच्या शिक्षकांचे लक्षणीय यश
या स्पर्धेत ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर संचलित ग्रामविकास माध्यमिक विद्यालय व ग्रामविकास उच्च माध्यमिक विद्यालयामधील शिक्षकांचा सहभाग लक्षणीय ठरला. या शाळांमधील अनेक शिक्षकांनी विविध स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि उत्कृष्ट कामगिरी केली. या शिक्षकांनी अनेक स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत शाळेचे तसेच पंचक्रोशीचे नाव उंचावले आहे. शैक्षणिक सादरीकरण, क्रीडा, कला, तांत्रिक कौशल्ये, कथाकथन, वक्तृत्व अशा अनेक क्षेत्रांत या शिक्षकांनी आपले कौशल्य व गुणवत्ता दाखवून दिली.
अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पी बी पाटील, चिटणीस एस व्ही गीते तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी जे तेली, उपमुख्याध्यापक पी ओ चौधरी, पर्यवेक्षक पी आर देशमुख व पी ए जाधव तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या स्पर्धांमुळे शिक्षकांना आपल्या सर्जनशीलतेचे प्रदर्शन करण्याची आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास साधण्याची उत्तम संधी मिळाली आहे, असे मत गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी व्यक्त केले.











