पिंपळगाव हरेश्वर | प्रा अमोल झेरवाल
नाशिक येथे दि. ३ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शालेय विभागीय ज्यूदो स्पर्धा–२०२६ मध्ये ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली. विद्यालयातील चार मुली व एका मुलाने या स्पर्धेत सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विविध वयोगटांत खेळाडूंनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत U-14 गटात नंदिनी बडगुजर हिने द्वितीय क्रमांक, तर प्रिया बडगुजर हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच U-17 गटात मोनाली पाटील हिने तृतीय क्रमांक, तर देवेश मालकर याने द्वितीय क्रमांक पटकावला. U-19 गटात वैष्णवी सपकाळ हिने तृतीय क्रमांक मिळवत आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडली.
या सर्व खेळाडूंनी विभागीय स्तरावर आत्मविश्वासाने व कौशल्यपूर्ण खेळ करत आपल्या विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत, नियमित सराव, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश विद्यालयातील क्रीडा संस्कृतीला निश्चितच बळ देणारे ठरले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीसाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सादिक शेख सर व प्रमोद कोळी सर यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नियमित सराव करत ज्यूदो खेळातील तंत्र, कौशल्य व शारीरिक क्षमता विकसित केली.
खेळाडूंच्या या यशाबद्दल ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र सुखदेव गीते (रवीभाऊ), चिटणीस यशवंत प्रभाकर पाटील (बाळूभाऊ) तसेच सर्व संचालक मंडळाने विजयी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
तसेच ग्राम विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जे. तेली सर, उपमुख्याध्यापक पी. ओ. चौधरी सर, पी. आर. देशमुख सर, पर्यवेक्षिका मंगला साळुंखे मॅडम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव हरेश्वर यांच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रीडा गुणवत्तेला योग्य मार्गदर्शन व संधी मिळाल्यास ते विभागीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे या यशातून अधोरेखित झाले आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून विजयी खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











