“शांततेत गुंतवणूक करा”चा संदेश देत भौतिकशास्त्र विभागाचा सामाजिक उपक्रम
जळगाव | प्रा अमोल झेरवाल
मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक शांतता दिनानिमित्त पथराड बु., ता. धरणगाव येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. २१ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शांतता, अहिंसा आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देत जनजागृती केली.
जागतिक शांतता दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात प्रा. डॉ. प्रतिभा निकम, भौतिकशास्त्र विभाग, मू. जे. महाविद्यालय, जळगाव यांनी “शांततेत गुंतवणूक करा : प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेस आणि प्रत्येकासाठी” या विषयावर बाळासाहेब आर. डी. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पथराड येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. डॉ. निकम यांनी जागतिक शांतता दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना शांतता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाचा भाग होणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले. भारताच्या शांतता आणि अहिंसेच्या परंपरेचा संदर्भ देत संत बुद्ध यांच्या शांती व अहिंसेच्या विचारांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून द्वितीय वर्ष भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी गावातील विविध चौकांमधून शांतीचा संदेश देणारे फलक हातात घेऊन जनजागृती रॅली काढली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे गावातील नागरिकांचे लक्ष शांतता आणि सामाजिक सलोख्याच्या संदेशाकडे वेधले गेले.
प्रा. डॉ. निकम यांनी जागतिक शांतता दिनाचा मूळ उद्देश, हा दिवस का साजरा केला जातो, त्याची सुरुवात कधी व कशी झाली याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात शांततेची आवश्यकता अधिक का आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात शांतता आणि सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मनोदय व्यक्त केला.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जगदीश पाटील, श्री. भूषण रायगडे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व परिचय श्री. प्रमोद पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. श्याम पाटील यांनी केले.











