
पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील जामखेडा नाल्यावरील रस्ता मुसळधार पावसामुळे अत्यंत धोकादायक बनला असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि नाल्यावरून वाहणारे पाणी यामुळे वाहनचालकांसमोर जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दीपक मुलमुले यांनी स्वतः भर पावसात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करत अनेक वाहनचालकांचे संभाव्य अपघात टाळले.
शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जामखेडा नाल्यावरून पाणी वाहत होते. रस्त्यावरील खड्डे पाण्याखाली गेल्याने त्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे कार, दुचाकी तसेच इतर वाहनचालक गोंधळून जात होते. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचारी यांना मोठा धोका निर्माण झाला होता.
यावेळी पत्रकार दीपक मुलमुले यांनी कोणतीही पर्वा न करता रेनकोट घालून प्रत्यक्ष पुलावर उभे राहत वाहनांना सुरक्षित मार्ग दाखविला. कारचालकांना कोणत्या बाजूने वाहन न्यावे, दुचाकीस्वारांना कुठे सावधगिरी बाळगावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या तत्परतेमुळे अनेक वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
स्थानिक नागरिकांनीही दीपक मुलमुले यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. “केवळ बातमी देण्यापुरते न थांबता संकटाच्या वेळी प्रत्यक्ष मदतीला धावून जाणे, हीच खरी पत्रकारितेची आणि समाजसेवेची ओळख आहे,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, ग्रामस्थांनी जामखेडा नाल्यावरील धोकादायक खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी पुन्हा एकदा प्रशासनाकडे केली आहे. पावसाळ्याच्या काळात या मार्गावर वाहतूक करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
– सुरक्षित रस्ता, सुरक्षित जीवन हीच काळाची गरज असून, संकटसमयी समाजासाठी पुढे येणाऱ्या दीपक मुलमुले यांच्या कार्याचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.











