पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
जळगाव जिल्ह्यासाठी कालपासून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यात काल दिवसभर रिमझिम व रिपरिप स्वरूपाचा पाऊस सुरू होता. मात्र मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर अचानक वाढला असून तालुक्यात सर्वत्र संततधार मुसळधार पाऊस कोसळत आहे.
यावर्षी अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकरी चिंतेत होते. अशा परिस्थितीत मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले असून पिकांना मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. या पावसामुळे शेतातील ओलावा वाढण्यास, पिकांच्या वाढीस चालना मिळण्यास तसेच विहिरी, तलाव व लहान-मोठ्या जलसाठ्यांमध्ये पाण्याची भर पडण्यास मदत होणार आहे.
मात्र दुसरीकडे, मुसळधार पावसाचा हा जोर आणखी काही तास कायम राहिल्यास अतिवृष्टीची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत सखल भागात पाणी साचणे, नद्या-नाल्यांना पूर येणे, शेतीपिकांचे नुकसान होणे तसेच जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून नदी, नाले व पूरप्रवण भागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही तास पावसाची स्थिती कशी राहते, याकडे शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष लागून आहे.











