पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या वतीने भडगाव रोडवरील शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात रोटरी प्रांत ३०३० चे प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या पदग्रहण समारंभानिमित्त प्रांतपाल डॉ. राजेश पाटील पाचोरा येथे आले होते. त्यांच्या भेटीचे औचित्य साधून शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपप्रांतपाल हरविंदरसिंग थेठी, उपप्रांतपाल भरत सिनकर, एन्क्लेव्ह पदाधिकारी डॉ. मुकेश तेली, गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे, रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे, युवा नेते अमोलभाऊ शिंदे, शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून भावी पिढीसाठी हिरवाई जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे प्रशासन सचिव डॉ. स्वप्निल पाटील, प्रकल्प सचिव प्रशांत सांगडे, उपाध्यक्ष डॉ. अजयसिंग परदेशी, माजी अध्यक्ष डॉ. अमोल जाधव, चंद्रकांत लोढाया, चंद्रकांत कोतकर, गिरीश दुसाने, चंद्रकांत बाजीराव पाटील, पिंकी जीनोदिया, संजय पाटील, स्वप्निल बागुल, गणेश मोरे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन रोटरी क्लब पाचोरा-भडगाव व शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.












