७२ वर्षांची यशस्वी वाटचाल : ग्राम विकास मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पिंपळगाव हरेश्वर (प्रा अमोल झेरवाल)
ग्राम विकास मंडळ व ग्राम विकास मंडळ संचालित ग्रामविकास विद्यालयाच्या स्थापनेस ७२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोमवार, २२ जून २०२६ रोजी विद्यालयात विशेष वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेच्या गौरवशाली परंपरेचा आढावा घेताना मान्यवरांनी संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक योगदानाचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष पी. एस. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे माजी अध्यक्ष एस. टी. गीते, ए. एस. जाधव, विद्यमान अध्यक्ष रवींद्र गीते, चिटणीस यशवंत पाटील, संचालक मिलिंद देव, डॉ. शांतीलाल तेली, प्रदीप बडगुजर, देविदास पाटील तसेच संचालक प्रतिनिधी शिवानंद पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा संक्षिप्त आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले.
यानंतर ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष ए एस जाधव यांनी संस्थेची यशोगाथा प्रभावी शब्दांत मांडली. विविध समाजघटकांतील दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन २१ जून १९५४ रोजी संस्थेची स्थापना केली. त्या काळी ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा निर्माण करून गावातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण निर्माण करण्यात संस्थेने मोलाची भूमिका बजावली. आज त्या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर एका भव्य वटवृक्षात झाले असून हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य संस्था करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात पी. एस. पाटील यांनी संस्थेच्या स्थापनेमागील प्रेरणा, संस्थापक अध्यक्ष व संचालक मंडळाचे योगदान याविषयी सविस्तर माहिती दिली. संस्थेने गेल्या सात दशकांमध्ये अनेक चढ-उतारांचा सामना करत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून समाजाच्या विश्वासामुळेच संस्था आज या उंचीवर पोहोचली असल्याचे त्यांनी नमूद केले. छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात झालेले रूपांतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रातील संस्थेच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही ग्राम विकास मंडळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य पी. जे. तेली, खाजगी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. महापुरे, उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात संस्थेच्या ७२ वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान आणि भावनिक वातावरण अनुभवास आले.
















