पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
21 जून 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब पाचोरा-भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शक्तिधाम, पाचोरा येथे योग व प्राणायाम शिबिराचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. निरोगी जीवनशैलीचा संदेश देत नागरिकांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली होते. यावेळी पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनचे चेअरमन डॉ. जीवन पाटील, अध्यक्ष डॉ. अजयसिंग परदेशी, उपाध्यक्ष डॉ. विजय जाधव, रोटरी क्लबचे पदाधिकारी, पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनचे सदस्य तसेच शहरातील अनेक पुरुष व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात योग शिक्षिका सौ. किशोरी पाटील यांनी विविध योगासने, प्राणायामाचे प्रकार व त्यांचे आरोग्यदायी फायदे याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. तसेच डॉ. विरेंद्र पाटील, डॉ. सिद्धांत तेली व डॉ. सोनाली पाटील यांनी आधुनिक जीवनशैलीत योगाचे महत्त्व, मानसिक व शारीरिक आरोग्य संवर्धनासाठी योगाची गरज आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे यावर सखोल मार्गदर्शन केले.
मानसिक तणाव कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच निरोगी व संतुलित जीवन जगण्यासाठी योग हा प्रभावी उपाय असल्याचे वक्त्यांनी यावेळी नमूद केले. उपस्थितांनी विविध योगासने व प्राणायाम प्रकारांचा प्रत्यक्ष सराव करून योग दिनाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे आरोग्य संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला असून उपस्थितांनी आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले.












