एस.एस.सी. परीक्षेत विद्यालयाचा ६४.८७ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

द्वितीय: साईप्रसाद संजय मालकर
पिंपळगाव (हरेश्वर) | प्रा अमोल झेरवाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज दि. ८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावी एस.एस.सी. परीक्षेच्या निकालात ग्रामविकास विद्यालय, पिंपळगाव (हरेश्वर) ता. पाचोरा या विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कॉपीमुक्त अभियानांतर्गत तसेच अत्यंत पारदर्शक व सीसीटीव्ही निगराणीखाली पार पडलेल्या परीक्षेत विद्यालयाचा निकाल ६४.८७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर घवघवीत यश मिळविले आहे.
विद्यालयातील कु. अन्वी मनोज पाटील हिने ९६.६० टक्के गुण मिळवत विद्यालयातून प्रथम तर पाचोरा तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अन्वी ही पिंपळगाव (हरेश्वर) येथील माजी सरपंच तसेच समर्थ गोविंद महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष कै. दामू धनजी पाटील यांची पणती असून ग्रामविकास विद्यालयाचे माजी अध्यक्ष पी. एस. पाटील यांची नात आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच चि. साईप्रसाद संजय मालकर याने ९१.८० टक्के गुण मिळवत विद्यालयात द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तर कु. कल्याणी रविंद्र गिते हिने ९१.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
विद्यालयात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, नियमित सराव परीक्षा, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले जाते. त्याचाच परिपाक म्हणून विद्यार्थ्यांनी यंदाच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे मत शिक्षकवर्गातून व्यक्त करण्यात आले.
या यशाबद्दल ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष पी. बी. पाटील, चिटणीस एस. व्ही. गिते, सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य पी. जे. तेली, उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख, पी. ए. जाधव तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.










