
पिंपळगाव हरे (प्रा अमोल झेरवाल)
ग्रामविकास विद्यालय, पिंपळगाव (हरे) येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, सहकार चळवळीचे प्रणेते व पंचायतराज व्यवस्थेचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य पी जे तेली व उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या प्रसंगी प्रा. मनोज सोनवणे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण हे राष्ट्रभक्तीची भावना जोपासणारे, सत्तेचे विकेंद्रीकरण घडवून आणणारे आणि सहकार चळवळीला नवी दिशा देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व होते. महाराष्ट्राच्या औद्योगिक व कृषी विकासाचा भक्कम पाया त्यांनी रचला. पंचायतराज व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण विकासाला चालना देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाते, असे त्यांनी नमूद केले.
उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी यांनी आपल्या भाषणात यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा गौरव करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास प्राचार्य पी जे तेली, पर्यवेक्षक पी. ए. जाधव, ग्रामविकास विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.












