पिंपळगाव (हरे) | प्रा अमोल झेरवाल
निमित्त ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव (हरे) येथे विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विज्ञान शिक्षक उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर आकर्षक व रोचक प्रयोग सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमादरम्यान विविध वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित “जादूचे प्रयोग” सादर करण्यात आले. या प्रयोगांच्या माध्यमातून अंधश्रद्धा व तथाकथित चमत्कार यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा स्पष्ट करण्यात आली. “चमत्कार नाही… विज्ञान आहे!” हा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन करण्यात आले.
उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विज्ञान दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची वृत्ती, संशोधनाची जिज्ञासा आणि तर्कशुद्ध विचारसरणी निर्माण करण्याचा दिवस आहे. अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जे. तेली होते. यावेळी पर्यवेक्षक पी. आर. देशमुख, पी. ए. जाधव तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप “अंधश्रद्धा दूर करूया, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवूया!” या घोषवाक्याने करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विज्ञान प्रयोगांविषयी विशेष कुतूहल व्यक्त केले.












