पिंपळगाव (हरे) | प्रा अमोल झेरवाल
ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव (हरे) येथे संत गाडगे बाबा यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे उपप्राचार्य पी. ओ. चौधरी यांच्या शुभहस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी संदीप पाटील सर यांनी संत गाडगे महाराजांच्या कार्याचा सविस्तर परिचय करून दिला. त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अज्ञान, निरक्षरता व अस्वच्छता यांविरुद्ध जनजागृती केली. “मानवता हाच खरा धर्म असून तीच ईश्वर सेवा आहे” हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण आणि आरोग्य यावर भर देत संतांनी अनेक शाळा व वसतिगृहांची उभारणी केली आणि लोकसेवेला सर्वोच्च स्थान दिले, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रा. राम पाटील यांनी आपल्या भाषणातून संत गाडगे महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी-परंपरांना त्यांनी ठाम विरोध केला. “सावकाराकडून कर्ज काढू नका, चोरी करू नका, प्राणिहत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका. देव दगडात नसून माणसात आहे,” असा त्यांचा संदेश समाजाला मार्गदर्शक ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्राचार्य पी जे तेली, पर्यवेक्षक पी. ए. जाधव, पी. आर. देशमुख यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय व प्रेरणादायी होते.

संत गाडगे महाराजांच्या कार्यातून स्वच्छता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.











