पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
पाचोरा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पाचोरा तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या मिशन स्कॉलरशिप उपक्रमांतर्गत ही सराव परीक्षा शुक्रवारी घेण्यात आली. गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे व गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या नियोजनानुसार तालुक्यातील केंद्र स्तरावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
या सराव परीक्षेत इयत्ता पाचवीचे ४३४ तर इयत्ता आठवीचे ११३ विद्यार्थी सहभागी झाले. परीक्षेचे आयोजन शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, प्रश्नसंच हाताळणी व वेळ व्यवस्थापनाचा सराव विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळाला.
मिशन स्कॉलरशिप उपक्रमांतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गही नियमितपणे घेण्यात आले. या सराव परीक्षेच्या यशस्वी नियोजनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, सरोज गायकवाड, सर्व केंद्रप्रमुख, परीक्षा समन्वयक सुभाष देसले, रावसाहेब साळुंखे, सुनील शिवदे, गिरीश भोयर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सर्व विशेष शिक्षकांनी परीक्षा पाहणीसाठी शाळांना भेटी देत आवश्यक मार्गदर्शन केले.
पाचोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अशा दोन शिष्यवृत्ती सराव परीक्षा नियोजित असून, पुढील परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून यशाचे प्रमाण निश्चितच उंचावेल, असे गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सांगितले. हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचा ठरत असून पालक व शिक्षक वर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.











