पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या शेतावर भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी आमदार पाटील यांनी मोसंबी व पपईच्या बागेची प्रत्यक्ष पाहणी करून बागेतील शेतीविषयक व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती घेतली.
शेतावर भेटीदरम्यान आमदार किशोर पाटील यांनी बागेची मशागत, बहारी व्यवस्थापन, तसेच फळांची विक्री व्यवस्था व बाजारपेठेतील अडचणी याविषयी सुनील पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली. फळबाग लागवडीत आधुनिक पद्धतींचा वापर, वेळेवर पाणी व्यवस्थापन, रोगकिड नियंत्रण, तसेच उत्पादनाचा दर्जा वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही त्यांनी चर्चा केली.
या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना, अनुदान, तसेच बाजार समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांचा अधिक लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच उत्पादन विक्री करताना योग्य दर मिळावा, शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी आणि थेट बाजारपेठेशी संपर्क वाढवावा यावर त्यांनी भर दिला.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, बापू काकडे, भगवान पांडे, दगा अण्णा यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी आमदार पाटील यांच्या या भेटीचे स्वागत करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार किशोर पाटील यांनी “शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या बागेवर प्रत्यक्ष येऊन समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे,” असे सांगत शेतकऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












