चांगल्या सवयी व आजारांवरील प्रतिबंधात्मक मार्गदर्शन; “रोटरी क्लब चा स्तुत्य उपक्रम”
पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
पाचोरा/भडगाव: बालदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्यातर्फे पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कुल प्री प्रायमारी, पुनगाव रोड येथे लहानग्यांसाठी आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित बालकांना चांगल्या आरोग्य सवयी आणि साथीच्या आजारांवरील प्रतिबंधाबद्दल तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
बालरोगतज्ज्ञांनी साधला हसत खेळत संवाद
या छोटेखानी कार्यक्रमात पाचोरा येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल पटवारी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हजेरी लावली. डॉ. पटवारी यांनी शाळेतील चिमुकल्या बालगोपालांशी त्यांच्याच भाषेत, हसत-खेळत संवाद साधला. लहान मुलांसाठी आवश्यक असलेल्या चांगल्या आरोग्यदायी सवयी कोणत्या आहेत, तसेच सध्याच्या वातावरणात साथीचे आजार वाढू नयेत यासाठी कोणती विशेष काळजी घ्यायची, याबद्दल सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. त्यांच्या या संवादात्मक सत्रामुळे मुलांमध्ये आरोग्याविषयीची जागरूकता वाढण्यास मदत झाली.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
यावेळी मंचावर रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह रोटरी क्लब पाचोरा भडगावचे सदस्य भरत सिनकर, चंद्रकांत लोढाया, डॉ. कुणाल पाटील, रावसाहेब पाटील, डॉ. बाळकृष्ण पाटील, संजय कोतकर, पिंकी जिनोदिया हे देखील उपस्थित होते. निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या फरीदा मॅडम यांनी क्लबच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार मानले. तसेच, शाळेतील सर्व शिक्षिका व इतर कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
खाऊचे वाटप करून उत्साहात सांगता कार्यक्रमाच्या शेवटी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लबच्या या आरोग्य आणि आनंद देणाऱ्या उपक्रमामुळे शाळेतील बालदिन उत्साहात आणि महत्त्वपूर्ण संदेश देऊन साजरा करण्यात आला.











