कु. दिव्याने राजपूत हिचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची पुन्हा एकदा चमकदार झलक पाहायला मिळाली. तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात विद्यालयाची विद्यार्थिनी कु. दिव्याने गोविंदसिंग राजपूत हिने आपल्या उत्कृष्ट वैज्ञानिक प्रतिकृतीचे प्रभावी सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे तिची जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे.
आज, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी पाचोरा शहरातील पी. के. शिंदे विद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी विजय पवार तसेच शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, संशोधन वृत्तीला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी या विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात कु. दिव्याने राजपूत हिने सादर केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृतीने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रतिकृतीची संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन, उपयुक्तता, कल्पकता तसेच प्रभावी सादरीकरण या विविध बाबींमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला.
या यशामागे ग्राम विकास विद्यालयाचे विज्ञान शिक्षक उल्हास श्रीराम पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कु. दिव्याने हिने वैज्ञानिक संकल्पनेचा सखोल अभ्यास करून प्रतिकृतीची निर्मिती व सादरीकरण केले. विद्यार्थिनीच्या या यशातून तिची जिज्ञासू वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि सादरीकरण कौशल्य अधोरेखित झाले आहे.
कु. दिव्याने राजपूत हिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सुखदेव गीते, चिटणीस यशवंत प्रभाकर पाटील तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळाने तसेच पिंपळगाव हरेश्वर केंद्राचे केंद्रप्रमुख सखाराम महाजन यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच ग्राम विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जे. तेली सर, उपमुख्याध्यापक प्रा. पी. ओ. चौधरी सर, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे कार्य ग्राम विकास विद्यालयात सातत्याने केले जात आहे. विविध विज्ञानविषयक उपक्रम, प्रयोग, प्रकल्प व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येत असून, त्यातून विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळत आहे. कु. दिव्याने राजपूत हिचे तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यातील यश हे विद्यालयाच्या या प्रयत्नांचे फलित असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
ग्राम विकास विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणाऱ्या कु. दिव्याने गोविंदसिंग राजपूत हिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यातही ती निश्चितच उज्ज्वल कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.











