पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
भारत विकास परिषद, पाचोरा शाखेच्या वर्ष २०२६–२७ या कार्यकाळासाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. प्रांत सचिव श्री. राजेंद्र जाखडी (धुळे) यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी रात्री झालेल्या ऑनलाइन बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी डॉ. पंकज हरणे व श्री. सतीश जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीनुसार डॉ. संजय जाधव यांची अध्यक्ष, डॉ. राहुल झेरवाल यांची उपाध्यक्ष तर गोकुळ सोनार यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच महिला सहभागिता समन्वयक म्हणून सौ. पूजा तांबोळी आणि संस्कार समन्वयक म्हणून श्री. कमलेश सोनवणे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून संस्कार, सेवा, संपर्क आणि पर्यावरण या चार प्रमुख घटकांवर आधारित विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. समाजात राष्ट्रीय भावना, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
याशिवाय, पाचोरा परिसरात व्यापक स्तरावर नवीन सभासद नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असून सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. पाचोरा शाखेला प्रांतातील आदर्श शाखा म्हणून विकसित करण्याचा संकल्प नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला.
बैठकीचा समारोप राष्ट्रप्रेमाच्या वातावरणात राष्ट्रगीताने करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी “जय हिंद! जय भारत!” अशा घोषणांनी राष्ट्रसेवेचा निर्धार व्यक्त केला.











